अमळनेर, (प्रतिनिधी) : शहरातील सानेनगर भागातील दीपाली सुभाष पाटील या तरुणीने १५ रोजी गुरुवारी पहाटे ३:४० वाजता स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दीपाली पाटील हि आई, वडील यांच्यासह राहत होती. तिचा गडखांब येथिल तरुणाशी दि. १७ रोजी विवाह होणार होता. दि. १५ रोजी तिच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. १४ रोजी रात्री तिच्या घराबाहेर संगीतचा कार्यक्रम झाला. तेव्हा दिपालीने ‘एन्जॉय’ करीत नृत्यही केले होते. मात्र भल्या पहाटे तिच्या आईला ती मृत अवस्थेत दिसून आली. तिने गळफास घेऊन तिचे आयुष्य संपवले होते.
दरम्यान यावेळी नातेवाईकांनी आक्रोश करत हंबरडा फोडला. दिपालीच्या मृत्यूमुळे लग्न असलेल्या घरात स्मशान शांतता पसरली. घटनेमुळे अमळनेर शहरात शोककळा पसरली आहे. तीने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.का. अशोक साळुंखे करीत आहे.