जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती शिवाजी नगरात बुधवारी दि. ७ मे रोजी पहाटेच्या सुमारास माहेरी आलेल्या विवाहितेच्या घरात घुसून गजानन बाविस्कर नावाच्या व्यक्तीने त्यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावले आणि पैशांचे पाकीट लुटून नेले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सपना शंकर वाघ (वय २७, रा. पारोळा) या पारोळा येथील आण्णाभाऊ साठे नगरात वास्तव्यास आहेत. सपना वाघ या आखाजीच्या निमित्ताने २८ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी नगरातील आपल्या माहेरी आल्या होत्या. मंगळवारी रात्री त्या आईवडिलांसोबत गप्पा मारून पावणेबारा वाजता घराचा दरवाजा लोटून झोपल्या होत्या. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांना कोणीतरी मानेला स्पर्श करत असल्याचे जाणवले. जाग येऊन पाहिल्यावर त्यांना त्यांच्याच परिसरातील गजानन बाविस्कर त्यांच्याजवळ उभा दिसला.
आरोपी गजानन बाविस्करने त्याच्या हातातील धारदार चॉपरचा धाक दाखवत सपना वाघ यांना पैसे काढण्याची धमकी दिली. शस्त्राला घाबरून त्यांनी आपल्याजवळ असलेले पैशांचे पाकीट त्याला दिले. त्यानंतर बाविस्कर तेथून पळून जाऊ लागला. पैसे घेऊन जाताना सपना वाघ यांनी आरडाओरड केल्याने घरातील आणि परिसरातील नागरिक जागे झाले. त्यांनी गजानन बाविस्करला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने चॉपर हवेत फिरवून जवळ आल्यास मारण्याची धमकी दिली, त्यामुळे नागरिक घाबरून माघारले. या घटनेनंतर सपना वाघ यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गजानन बाविस्करविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.