जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील मेहरुण परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील इको क्लबचे सदस्य इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी जांभुळ, सिताफळ, गुलमोहर, नीम, गुलमोहर, नीम, बकुळ या बियांचे संकलन करून २०० सीडबॉल बनवून मागच्या वर्षी लांडोर खोरी परिसरात लागवड केले होते. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये हनुमंत खोरा परिसरात सीड बॉल टाकण्यात येणार आहे.
वाढते तापमान, कमालीचा उकाडा, पाण्याचे दुर्भिक्ष, पावसाची अनिश्चिती, जास्त प्रमाणात झालेली वृक्ष तोड यामुळे भविष्यात होणारे दुष्परिणाम लक्षात घेत व शासनाने केलेल्या ३ कोटी वृक्षारोपण या संकल्पनेस हातभार लावण्यासाठी शाळेच्या इको क्लब च्या माध्यमातून सीडबॉलचा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी उपायुक्त यांना सीडबॉल बाबत माहिती दिली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी असे उपक्रम राबविले पाहिजे, असे मत जळगाव शहर महानगरपालिकेचे उपायुक्त पंकज गोसावी यांनी व्यक्त केले. यावेळी अधिकारी प्रकाश पाटील व संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक उपस्थित होते.