जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील रक्तदात्यांना संघटित करून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा रक्तदाता असोसिएशन या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेची नोंदणी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून अधिकृतपणे प्रमाणित झाली असून, संस्था रक्तदानासारखे महत्त्वाचे कार्य करण्यासाठी सज्ज झाली आहे अशी माहिती ॲड. जमील देशपांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली.
असोसिएशनचे उद्दिष्ट असे आहे की, जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबात किमान एक रक्तदाता तयार करणे हे आहे. यासाठी विविध उपक्रम, जनजागृती मोहिमा, शाळा-काॅलेज मध्ये मार्गदर्शन, सामाजिक संस्था व डॉक्टर्सच्या सहकार्याने आयोजन करण्यात येणार आहे. नियमित रक्तदात्यांची यादी, त्यांची माहिती व गरज पडल्यास तातडीने संपर्क साधण्याची यंत्रणा विकसित केली जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर असोसिएशनची शाखा स्थापन केली जाईल व “रक्तमित्र” या घोष वाक्याद्वारे जनजागृती मोहिम राबवली जाईल.
जळगाव जिल्हा रक्तदाता असोसिएशनचे सभासद होण्याकरिता दि. १ मे २०२५ पासून नाव नोंदणी सुरू होणार आहे. ज्यांना किमान वर्षातून एकदा रक्तदान करण्याची इच्छा असेल अशा रक्तदात्यालाच असोसिएशनचे सभासद होता येईल. रक्तदान ही श्रेष्ठतम मानवसेवा आहे. अपघातग्रस्त, मोठ्या शस्त्रक्रिया करणारे, कर्करोगग्रस्त, थॅलेसेमिया, हिमोग्लोबिनच्या कमतरतेने त्रस्त रुग्ण यांना वेळेवर रक्त उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. माणूसच माणसाला रक्तदान करू शकतो. त्यामुळे रक्तदात्यांचे संघटन आणि संवेदनशीलतेची गरज अधोरेखित होते.
नियमित रक्तदान करणाऱ्या, आपत्कालीन रक्त गरजेस प्रतिसाद देणाऱ्या व रक्तदानाबाबत जनजागृती करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी “रक्तमित्र पुरस्कार” देऊन गौरव करण्यात येणार असून जळगाव जिल्ह्यातील सक्रिय रक्तदात्यांचा डेटा संकलित करून एक विश्वासार्ह व तत्काळ मदतीसाठी सज्ज “रक्तमित्र बँक” उभारण्यात येणार आहे. या बँकेमार्फत रक्ताची तातडीची गरज भासल्यास रुग्णांना नाममात्र दरात त्वरित मदत मिळवून दिली जाईल.
जळगाव जिल्हा रक्तदाता असोसिएशनच्या विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली असून यात अध्यक्षपदी ॲड जमील देशपांडे, उपाध्यक्ष किरण तळले, सचिव ललित शर्मा, सह सचिव सतीश सैंदाणे, खजिनदार श्रीकृष्ण मंगळे, संदीप मांडोळे, महेंद्र सपकाळे, चेतन पवार, अविनाश पाटील, जितेंद्र पाटील, विक्रम कापडणे, राजेंद्र मिस्त्री, साजन पाटील आहेत.