अमळनेर, (प्रतिनिधी) : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा बेकायदेशीर साठा करून तो गॅस खाजगी वाहनात भरण्याचा व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल ३८ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील श्रीकृष्ण कॉलनीतील खुल्या जागेत घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करून वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री पावणे आठ वाजता घटनास्थळी छापा टाकला असता त्यांना वाहनात (एमएच ४३, एएन ११७४) इलेक्ट्रिक पंपाद्वारे घरगुती सिलिंडर मध्ये गॅस भरला जात असल्याचे आढळून आले. या वेळी पोलिसांनी धनंजय प्रभाकर पाटील (वय ४८ रा. श्रीकृष्ण कॉलनी) आणि अमोल सुभाष बोरसे (वय ३७, रा. धार, ता. अमळनेर) या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्या जवळून १ लाख ५० हजार रुपयांची चारचाकी, ८ हजार रुपयांचे भारत गॅस चे ४ सीलबंद सिलिंडर, ११ हजार रुपये किमतीचे भारत गॅस चे ११ खाली सिलिंडर, ३ हजार रुपये किमतीचे एचपी गॅसचे ३ खाली सिलिंडर, २० हजार रुपये किमतीचा गॅस भरण्याचा इलेक्ट्रिक पंप व नळ्या जप्त केल्या. तर दुसऱ्या कारवाईत, दिनांक २२ रोजी दुपारी १२ वाजता पाचपावली मंदिर परिसरात दोघे तेच उद्योग करीत असल्याची माहिती मिळाली होती.
पोलिसांनी छापा टाकून जयेश संजय साळी (वय २७, रा. शिरूड नाका अमळनेर), चंदन प्रल्हाद साळी (वय ४५, रा. रामेश्वर नगर शिरूड नाका) यांना वाहनात गॅस भरताना रंगेहात पकडले. त्यांच्याजवळून १४ हजार रुपये किमतीचे ७भरलेले गॅस सिलिंडर, ६ हजार रुपये किमतीचे भारत गॅसचे रिकामे सिलिंडर, १० हजार रुपये किमतीचे एचपी गॅसचे १० रिकामे सिलिंडर, १० हजार रुपये किमतीचा गॅस भरण्याचा इलेक्ट्रिक पंप असे एकूण ४० हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.
ही कारवाई परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, प्रशांत पाटील, विनोद संदानशीव, उज्वल म्हसके, नितीन कापडणे यांनी केली आहेत.