जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील तरसोद फाट्या जवळ जळगाव येथून भुसावळ येथे कर्तव्यावर जात असताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील रेल्वे पोलीस कर्मचारी अपघातात गंभीर जखमी झाला आहे. सदर पोलीस कर्मचाऱ्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलीप पुना बारी (वय ४५, रा.रायसोनी नगर, जळगाव) राहणार शिरसोली असे जखमी पोलिसाचे नाव आहे. ते परिवारासह रायसोनी नगर येथे राहतात. ते रेल्वे पोलीस बल, भुसावळ येथे कार्यरत आहेत. दरम्यान गुरुवारी दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे ते राहत्या घरुन भुसावळ येथे नोकरीसाठी दुचाकीवरून निघाले होते. तरसोद फाटा ओलांडल्यानंतर महिंद्रा शोरूम जवळ आले असताना भरधाव वाहनाने त्यांना मागून जबर धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले.
पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी त्यांना घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी प्रथमोपचार केल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान घटनेची माहिती नशिराबाद पोलीस स्टेशन घेत असून नोंद घेण्याचे काम सुरू होते. या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील अपघाताची मालिका समोर आली आहे.