जळगाव, (प्रतिनिधी) : बालकांचे आरोग्य उत्तम राहण्यासोबतच बालवयातच बालकांच्या प्रकृतीशी संबंधित सूक्ष्म लक्षणांची नोंद रहावी व बालकांना वेळीच उपचार करणे सोपे जाऊन बालके निरोगी रहावेत, यासाठी या पुढे जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीत बाल संगोपन रजिष्टर ठेवण्यात येणार आहे. या रजिष्टरमधे बालकाच्या प्रकृतीशी संबंधित लक्षणांची नोंद करण्यात येणार आहे. या बाबतचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिले आहेत.
जळगाव जिल्ह्यात एकूण ३ हजार ४३५ अंगणवाडी आहेत.जिल्ह्यातील अंगणवाडीमधे बालकांच्या आरोग्याशी सबंधित विविध बाबांच्या नोंदी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्या माध्यमातून घेण्यात येतात. या नोंदीमुळे ग्रामीण भागातील बालकांचे आरोग्य चांगले ठेवण्यात मदत होते. त्या सोबतच बालकांमध्ये आजाराशी संबंधित गंभीर लक्षणे आढळून आल्यास वेळेवर उपचार करणे देखील सोपे जाते. मात्र बरेच वेळा बालकांमध्ये आढळणाऱ्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष होते. काही छोट्या लक्षणांचे रुपांतर पुढे जाऊन गंभीर आजारांमध्ये होण्याची शक्यता असते. त्यामुळे बालकांमधील आरोग्याशी संबंधित विविध लक्षणांवर वेळीच निदान करता यावे व बालकांच्या आरोग्याशी संबंधित भविष्यात उदभवणाऱ्या बाबींना वेळीच आळा घालता यावा यासाठी या पुढे प्रत्येक अंगणवाडीत बालसंगोपन रजिष्टर ठेवण्यात येणार आहे.
त्या सोबतच राष्ट्रीय आरोग्य बाल स्वास्थ मिशन कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक बालकाचा गुगल फॉर्म भरण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक बालकाचे प्रकृतीचे अपडेट घेणे शक्य होणार आहे.जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात आणि डोंगरी भागात लहान बालकांमध्ये कुपोषणाची समस्या मोठी आहे. बाल स्वास्थ्य रजिष्टरमुळे लहान वयापासूनच बालकांच्या प्रकृती संदर्भातील सर्व माहिती संकलित होणार असल्याचे कुपोषणाची लक्षणे दिसणाऱ्या बालकांवर उपचार होण्यास मदत होणार आहे.