जळगाव, (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील चौगाव येथे गेल्या वर्षी जिल्हा परिषद प्रशासनाकडून रासायनिक पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून तेथील पाणी हे पिण्यायोग्य असल्याबाबत निष्कर्ष प्राप्त झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून न जाता किडनीशी संदर्भित आजाराची लक्षणे जाणवू लागल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे व गावात ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्यासाठी मोफत आरो प्लांट उभारण्यात आलेला असून ग्रामस्थांनी त्या आरो प्लांट वरून शुद्ध पिण्याचे पाणी पिण्यासाठी वापरावे असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
चौगाव येथे पाण्यामुळे किडनीचे आजार मोठ्या प्रमाणात बळवल्याच्या संदर्भात प्रसार माध्यमे तसेच इतरत्र माध्यमातून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर लागलीच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आरोग्य यंत्रणेला सूचना करीत चौगाव येथे भेट देऊन माहिती जाणून घेण्याचे आदेश दिले होते. प्राप्त माहितीनुसार चौगाव येथे जैविक पाणी नमुना तपासणी अहवाल मार्च २०२५ नुसार गावातील पाणी पिण्यास योग्य असल्याच्या संदर्भात अहवाल प्राप्त झाला होता. मागील एक वर्षात दूषित पाण्यासंदर्भात कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही. मात्र असे असताना १७ एप्रिल रोजी नियमित रासायनिक तपासणीसाठी पाणी नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले असून अद्याप अहवाल येणे बाकी आहे.
सध्या चौगाव येथे किडनी आजारासाठी डायलिसिस उपचार सुरू असलेल्या तीन रुग्ण गावात आहेत. तर गावातील सात ते आठ जणांना मुतखड्याचा त्रास असल्यास संदर्भात माहिती प्राप्त झाली आहे. मागील एक वर्षात किडनी आजारामुळे गावात कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्यास संदर्भात देखील माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान प्राप्त होत असलेल्या तक्रारी व त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर यांच्यासह आरोग्य पथकाने चौगाव येथे भेट देऊन पाहणी केली आहे.
सदरील परिस्थितीत ग्रामस्थांनी भयभीत न होता पाण्यामुळे आजाराची लक्षणे जाणवू लागल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. ग्रामपंचायत तर्फे चौगाव गावात पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट उपलब्ध करून देण्यात आला असून तेथून मोफत पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी फिल्टर झालेल्या सुद्धा आरो पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा असे आवाहन करण्यात आले आहे.