जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील कानळदा रोडवरील फुपनगरी फाट्याजवळ शेतातून घरी जात असलेल्या एका महिलेला समोरून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने हात आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना नुकतीच घडली. दरम्यान जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोकिळा लालचंद सोनवणे (वय-५५, रा. कानळदा ता. जळगाव) या महिला शनिवारी १९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता शेतातून काम करून घरी कानळदा येथे पायी जात होत्या. जळगावकडून चोपडाकडे जाणारी दुचाकी क्रमांक (एमएच १९ इबी ६९०६ ) याने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात कोकिळा सोनवणे या महिला यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान त्यांना जखमी अवस्थेत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
या संदर्भात कोकिळा सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस नाईक मनीषा उमराणे ह्या करीत आहे.