जळगाव, (प्रतिनिधी) : महावितरणच्या कार्यालयात कर्तव्यावर असताना तरुण वायरमनला अचानक हृदयविकाराचा झटका आला अन त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवार दि. २० एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजीनगर येथील कार्यालयात घडली आहे. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला असून महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मनोज रामू लांडगे (वय ३०, रा. सत्यम पार्क, जळगाव, मूळ टेकाअर्जुने ता. दिवटी जि. चंद्रपूर) असे मयत वायरमनचे नाव आहे. ते आई, वडील, पत्नी, एक ४ वर्षांचा मुलगा यांचेसह राहत होते. महावितरणच्या कार्यालयात वायरमन म्हणून गेली ८ वर्षे ते जळगावत सेवेत होते. दरम्यान मनोज लांडगे रविवारी दि. २० एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे महावितरणच्या छत्रपती शिवाजीनगर येथील कार्यालयामध्ये सहकाऱ्यांसह कर्तव्याला होते. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास खुर्चीवर बसले असताना अचानक त्यांची छातीत दुखू लागले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने सुरुवातीला छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात दाखल केले. तेथून वैद्यकीय पथकाने पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मनोज लांडगे यांना मयत घोषित केले. या वेळेला कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान मनोज लांडगे यांना घेऊन रुग्णालयात आलेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच मनोज लांडगे यांच्या कुटुंबियांना या घटनेमुळे जबरदस्त धक्का बसला आहे.तरुण वायरमनचा अचानक मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अनेकांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. तर घटनेबद्दल जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.