चोपडा, (प्रतिनिधी) : अनेक वेळेला आश्चर्यचकित करणाऱ्या बाबी पोलीस तपासात समोर येत असतात. अशीच एक घटना बुधवारी समोर आली आहे. चक्क चोरी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकच चोरट्यांच्या टोळीसोबत आल्याचे दिसून आले आहे. चोपडा शहरातील बसस्थानक परिसरात चोरी करण्यासाठी टोळीसोबत आलेल्या जालना येथील पीएसआयचा स्थानिक गुन्हे शाखेसह चोपडा पोलिसांनी पर्दाफाश केला.
पळून जात असतांना या पथकाने प्रल्हाद पिराजी मालटे (वय ५८, रा. सदर बाजार, जालना) या पीएसआयसह तिघं चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यात सहभागी असलेला पीएसआय तीन महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते, मात्र त्यापुर्वीच त्यांच्या कारनामांचा भांडाफोड झाला आहे. चोपडा शहरातील बस स्थानक परिसरात बाहेर जिल्ह्यातील टोळीकडून गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे दागिने आणि पैसे लांबवित असल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह एलसीबीचे पथक संशयितांच्या मागावर होते.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पथक बस स्थानक परिसरात सापळा रचून बसलेले होते. दरम्यान, चोरीच्या उद्देशाने आलेली टोळी पळून जात असतांना त्यांना ही टोळी (एमएच ४३, २९२८) क्रमांकाच्या चारचाकीतून पसार झाल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने धरणगाव नाक्यावर सापळा रचत पळून जाणाऱ्या टोळीला अडविले. या वाहनात टोळीसोबत असलेले जालना येथील पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मालटे हे देखील मिळून आले.
बस स्थानक परिसरात चोरी करणाऱ्या टोळीतील श्रीकांत भिमराव बघे (वय २७ रा. गोपाल नगर, खामगाव), अंबादास सुखदेव साळगावकर (वय ४३ रा. माना, ता. मूर्तिजापुर जि. अकोला), रउफ अहमद शेख (वय ४८, रा. महाळस, जि. बीड) यांच्या मुसक्या आवळल्या. यातील अंबादास साळगावकर याच्यावर तब्बल २७ चोरीचे गुन्हे दाखल आहे. त्यामुळे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई चोपडा पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, जितेंद्र वल्टे, पोहेकॉ विलेश सोनवणे, दिपक माळी, रवींद्र पाटील, पोना हेमंत पाटील यांच्या पथकाने केली.
जालना पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले प्रल्हाद मानटे यांना चोरट्यांच्या टोळीसोबत चोरी करण्यासाठी येतांना पथकाने ताब्यात घेतले. उपनिरीक्षक मानटे यांच्या सेवानिवृत्तीला अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. उपनिरीक्षक सदर बाजार परिसरातील बस स्थानकावर ड्युटीवर असतांना त्यांची या संशयितांसोबत ओळख झाली. तेथूनच हे त्यांच्या संपर्कात असल्याचे देखील पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.