अमळनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील १५५ गावांची सनद असलेला ३० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप भूमिअभिलेख कार्यालयातून चोरटयांनी लंपास केल्याची घटना दि. ३ रोजी रात्री ते ४ एप्रिल रोजी सकाळच्या दरम्यान घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूमिअभिलेख उपअधीक्षक स्मिता पोरक्षा गावित या दि. ३ रोजी त्यांचा १५५ गावांची सनद आणि वरिष्ठांनी केलेला पत्रव्यवहार असलेला लॅपटॉप संध्याकाळी लोखंडी कपाटात ठेवून नंदुरबार निघून गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्या कार्यालयात आल्यानन्तर त्यांनी लॅपटॉप शोधला तो आढळून आला नाही. म्हणून कर्मचाऱ्याना विचारले असता रमेश नामदेवराव गायकवाड यांनी सांगितले की, मी रात्री उशिरा साडे अकरा वाजेपर्यंत कार्यालयात कामकाज करून कुलूप लावून घरी गेले होते.
रमेश गायकवाड, राहुल वाघ, कमलेश, सुधीर सोनार या कर्मचाऱ्यांनी नंतर विचारपूस करून सांगितले की, दि. ४ रोजी सकाळी ८ वाजता कार्यालयात आले तेव्हा कार्यालयाचे कुलूप उघडे होते. उपअधीक्षक स्मिता गावित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.