जळगाव, दि. 28 – भगवंताच्या स्वरूपापर्यंत पोहोचणे हा अत्यंत आनंदाचा क्षण असतो. परमात्म्याचे पद मिळणे कठीण असते. साधकालाच फक्त हे पद मिळते. भक्तीच्या रूपाने साधना करावी लागते. भक्तीचा भाविकांच्या अंतकरणात जिव्हाळा असायला पाहिजे. तेव्हा त्याला अध्यात्मिक ज्ञान मिळते, असे मार्गदर्शन तळवेल येथील किशोर महाराज यांनी केले.
मेहरुण भागामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन २५ नोव्हेंबर २ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. सप्ताहाचे २१ वे वर्षे आहे. शनिवारी रात्री तळवेल येथील किशोर महाराज यांनी प्रबोधन केले.
किशोर महाराज पुढे म्हणाले की, भगवंतांच्या सान्निध्यात राहिले तर मनःशांती लाभते. श्रीकृष्ण आणि गोपिकांची भक्ती याविषयी सांगून त्यांनी देव भावाचा भुकेला असतो हे स्पष्ट केले. आपण निस्वार्थ भावनेने भक्ती करीत गेलो तर देवाची कृपा आपल्यावर होतेच. श्रद्धा असणे त्यासाठी महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. प्रसंगी संतांचे विविध अभंग आणि दोहे सांगून त्यांनी प्रबोधन केले. यावेळी आयोजक नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह मेहरुण परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.