जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील बजरंग बोगदा परिसरात पिंप्राळा रस्त्यावर पायी जात असलेल्या ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून चोरटे पसार झाल्याची घटना शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता राजेंद्र जैन (वय ५५, रा. मोरेश्वर अपार्टमेंट, प्रेम नगर, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. अनिता जैन या शुक्रवारी दि. ११ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास बजरंग बोगदाजवळ भाजीपाला विक्री व किराणा दुकान असणाऱ्या सार्वजनिक जागी पिंप्राळा रस्त्यावर पायी जात होत्या. त्या वेळेला अज्ञात चोरट्यांनी दुचाकीने येऊन फिर्यादीचे पाठीमागून त्यांच्या गळ्यातील १ लाख ५० हजार रुपयांची २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून पसार झाला.
या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अनिता जैन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सपोनि संतोष चव्हाण हे तपास करीत आहे.