जळगाव, दि. 28 – जळगाव येथील जैन इरिगेशनमधील सुरक्षा विभागातील सहकारी सुभाष देशमुख यांचा मुलगा उत्कर्ष याला गोव्याच्या साळगावकर फुटबॉल क्लबतर्फे संतोष ट्रॉफी सिनियरसाठी खेळण्याची संधी प्राप्त झाली झाली आहे. या स्पर्धेच्या निवडचाचणीसाठी 300 हून अधिक खेळाडू होते त्यात उत्कर्षने दाखविलेली चुणूक व कौशल्यामुळे उत्कर्षने पहिल्या 20 खेळाडूंमध्ये स्थान पटकावले. त्याच्या उत्तम कामगिरीमुळे त्याची निवड झाली हे विशेष. 29 नोव्हेंबर रोजी राजस्थान जयपूर येथे जाण्यासाठी संघ रवाना होत आहे. 3 व 5 डिसेंबर2021 ला संतोष सिनियर ट्रॉफीचे सामने रंगणार आहेत.
उत्कर्षची सुरूवात जैन स्पोर्टस् अकॅडमीतून झालेली आहे. त्याच्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन, जैन स्पोर्टस् अकॅडमीचे संचालक अतुल जैन यांनी त्यांचे अभिनंदन केले. उत्कर्षला लहानपणापासून फुटबॉल खेळ व इतर खेळांबद्दल नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. त्यादृष्टीने त्याने फूटबॉलचा खूप सराव केला. जळगाव येथील फुटबॉल कोच धीरज मिश्रा यांच्या मार्गदर्शनानुसार तो खेळला आणि खेळात वेगळा असा ठसा उमटवू शकला. ट्रॉफी आणि पदकांनी त्याचा गौरव झाला.
गोव्याचा साळगावकर फुटबॉल क्लब फुटबॉल क्षेत्रात लौकीक मिळविलेला क्लब आहे. त्यात त्याला खेळण्याची, चमकदार कामगिरी करण्याची संधी प्राप्त झाली. त्याने फूटबॉल आपल्या पुरता मर्यादीत न ठेवता अनेक तरुणांना या खेळाचे प्रोत्साहन दिले व करियर म्हणून देखील या फुटबॉल खेळाकडे बघ्याच्या दृष्टीकोन युवा खेळाडूंना दिला.