जळगाव, दि. 27 – महिलेला माहेरी सुख असतं तर सासरी दुःख असतं असं चित्र निर्माण केलं जातं. मात्र दोन्ही बाजूने जर समजून घेतलं तर स्वर्ग निर्माण होतो. त्यामुळे जसा मुलीचा आदर असतो तसा सुनेचा आदर असावा. जसा आईचा आदर आहे तसा सासूचा देखील आदर असावा, असे मार्गदर्शन गहूखेड्याचे ह.भ.प. लखन महाराज यांनी केले.
मेहरूण प्रभागामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. सप्ताहाचे २१वे वर्षे आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री गहूखेडा येथील कीर्तनकार हभप लखन महाराज यांनी प्रभावी शैलीमध्ये भाविकांचे प्रबोधन केले.
लखन महाराज पुढे म्हणाले की, आयुष्यामध्ये माणूस पुढे जाण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असतो. हे प्रयत्न करीत असताना त्यांना अनेकदा अपयशाचे तडाखे सहन करावे लागतात. मात्र अपयश ही यशाची पायरी आहे, नेहमी विसरता कामा नये. यश आहे तर अपयश आहे. अपयश आहे तेथे शिकवण आहे. कुठल्याही कामामध्ये जीव ओतून काम करा, असेल मरगळ तर निघून जाईल आणि हाती घेतलेले काम यशस्वी होईल असा मूलमंत्र हभप लखन महाराजांनी दिला. सासर-माहेरची व्याख्या समजावून सांगत लखन महाराजांनी, प्रत्येक महिलेला आयुष्यात त्रास होतो मात्र हा त्रास न वाटून घेता त्याचे निराकरण सोप्या पद्धतीने केले व प्रत्येकाने आपल्या घरातील स्त्रीला समजून घेतले तर प्रत्येक घरात स्वर्गाचे नंदनवन निर्माण होईल असे त्यांनी कीर्तनात सांगितले.
यावेळी आयोजक नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह मेहरुण परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता गोजोरा येथील शरद महाराज कीर्तन करणार आहेत.