जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद ते तरसोद दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन त्यामध्ये बोदवड येथील वरिष्ठ लिपिक ठार झाले. तसेच दुसऱ्या दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
योगेश बळीराम पाटील (५१, रा. चैतन्य नगर, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. योगेश पाटील यांच्या पत्नी लघुपाटबंधारे विभागात कर्मचारी आहेत. बोदवड येथे न्यायालयात वरिष्ठ लिपिक म्हणून ते नोकरीला होते. योगेश पाटील हे दररोज जळगाव ते बोदवड ये-जा करतात. मंगळवारी दि. १ एप्रिल रोजी रात्री ते दुचाकीने बोदवड येथून जळगावला नोकरी सुटल्यावर येत होते. तेव्हा नशिराबाद ते तरसोद फाट्यादरम्यान हॉटेल सावन समोर समोरून येणाऱ्या दुचाकी सोबत त्यांच्या दुचाकीची धडक झाली.
यामध्ये पाटील हे रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. तर समोरील दुचाकी वरील मुस्तफा लतिफ खान (वय ६५), बी. ओ. फर्नांडिस (वय ६१, दोघे रा. भुसावळ) हे देखील खाली कोसळले. तिघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे योगेश पाटील यांना तपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. जखमी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. मयत योगेश पाटील यांच्या कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात एकच आक्रोश केला होता.