चाळीसगाव, (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहरातून धुळ्याकडे जाणाऱ्या कारला समोरून येणाऱ्या दुसऱ्या भरधाव कारने जबर धडक दिली. या धडकेत एका परिवारातील ४ वर्षीय मुलगा जागीच ठार झाला असून त्याचे आई-वडील व बहीण असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
चाळीसगांवकडून धुळ्याकडे जात असलेल्या टाटा कंपनीच्या नॅक्सॉन (एम.एच.५२/बी ०९९६) या चारचाकी वाहनाला विरूध्द दिशेने येणाऱ्या फॉर्च्यूनर (एम.एच. १८/बीएक्स ००११) वाहनाने भोरस गावाजवळ जबर धडक दिली. या अपघातात नॅक्सॉन कार चालक दिनेश देवराम महाजन यांचा मुलगा देवांश दिनेश महाजन (वय ४) हा जागीच ठार झाला तर दिनेश देवराम महाजन आणि त्यांची पत्नी स्वाती दिनेश महाजन व मुलगी आरोही दिनेश महाजन (वय १२) हे गंभीर जखमी झाले आहेत.
ज्या फॉच्युनर कारने दिनेश महाजन यांच्या वाहनाला धडक दिली ती फॉच्र्च्यूनर डॉ. उत्तमराव धनाजी महाजन यांची असून ते स्वतः सदरची वाहन चालवत होते. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर आजुबाजुचे लोक जमा झाले होते. अपघाताची माहीती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सदिप घुले व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना मिळाल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी गेले. जखमींना उपचारार्थ ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला सदर अपघात प्रकरणी रात्री उशिरापर्यंत उत्तम महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.