पाचोरा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पुनगांव येथील २२ वर्षीय तरुण गुढीपाडव्याच्या दिवशी म्हशी धुण्यासाठी गिरणा नदीत गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला २२ वर्षीय मुलगा अल्केन परदेशी हा वडिलांना शेती कामात व गुरांना चारा पाणी करण्यासाठी नेहमीच मदत करीत होता. शेतकरी जीवन परदेशी यांचा एकुलता एक मुलगा आहे. दि.३० एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तो म्हशींना पाणी पिण्यासाठी व धुण्यासाठी गिरणा नदी पात्रात घेऊन गेला होता. म्हशी खोल पाण्यात जात असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी तो पाण्यात उतरला व त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.
नदीपात्रातील काही लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच त्याला वाचवण्यासाठी धाव घेत वाचवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यात वाचवणाऱ्यांना यश आले नाही. लगेचच त्याला पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. अल्केन परदेशी याचा गुढीपाडव्याच्या दिवशीच पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आई वडिलांचा एकुलता एक २२ वर्षीय तरुणाचा सणासुदीच्या दिवशी मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.