अमळनेर, (प्रतिनिधी) : शहरातील एका भागात सात वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने गरोदर राहिल्याने बाळाला जन्म दिला. तसेच तिच्या बहिणीशी देखील प्रेम संबंध ठेवून पीडित तरुणीला पत्नी व बाळाचा बाप म्हणून दर्जा देण्यास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध पोस्को व ऍट्रोसिटी कायद्याप्रमाणे अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूड नाका येथील संशयित गौरव विजय पाटील याने २०१७ मध्ये १७ वर्षाच्या एका मुलीशी प्रेमाचे संबंध ठेवले. तिला लग्न करण्याचा आग्रह करून नाही सांगितल्यास आत्महत्येची धमकी देत होता. म्हणून ती पीडित तरुणी २०१७ मध्ये ऑगस्ट महिन्यात गौरव सोबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रांजणगाव येथे गेली. तेथे पीडिता गर्भवती राहिली. ती सात महिन्यांची गर्भवती असताना तिने गौरवला लग्नाची गळ घातली. मात्र त्याने लग्न केले नाही. गौरवने तिला पालघर येथे त्याच्या मित्राकडे नेले. त्याचवेळी पीडितेची लहान बहीण कोणातरी पुरुषासोबत पळून गेली होती. बहिणीचे तिच्या प्रियकराशी वाद झाल्याने ती पीडिता आणि गौरव यांच्याकडे राहायला आली.
तेव्हा पीडितेची बहीण आणि गौरव यांच्यातही प्रेमसंबंध जमले. त्यांच्यातही पीडितेसमोर शारीरिक संबंध जमले. पीडितेने त्याला विरोध केला असता तो तिला मारहाण करून शिवीगाळ करत होता. पीडिता ७ जानेवारी २०१९ रोजी खाजगी रुग्णालयात प्रसूत झाली. तिने मुलाला जन्म दिला. मुलगा चार महिन्यांचा झाल्यावर गौरव त्यांना अमळनेर येथे राजाराम नगर येथे राहायला घेऊन आला. मात्र त्याला वारंवार पीडितेने पत्नीचा दर्जा आणि बाळाला मुलाचा दर्जा देण्याची विनंती केल्यावर देखील त्याने नकार दिल्याने पीडितेने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. संशयित आरोपी गौरव पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी विनायक कोते करीत आहेत.