जळगाव, (प्रतिनिधी) : येथील मेहरूण परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इको क्लब तर्फे“ संकल्पाची गुढी” हा उपक्रम शनिवारी घेण्यात आला. कडुलिंबाची झाडाची पाने न तोडता कडुलिंबाच्या झाडाला गुढी करून इको क्लबच्या संकल्पाचे तोरण बांधण्यात आले.
विद्यालयात गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उपक्रमात सहभाग घेतला. सुरुवातीला इको क्लबचे प्रमुख मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी झाडाच्या गुढीचे पूजन करून शाळेत गुढी उभारली.
दरम्यान पर्यावरण संवर्धनासाठी मुलांना इको क्लब चे सात संकल्प सांगून त्याची माहिती दिली. पर्यावरण विषयक जनजागृती, ई-वेस्ट, प्लास्टिक याचे होणारे परिणाम आणि दुष्परिणाम यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले.