किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : जामनेर पंचायत समितीची जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू असतांना इमारतीचा काही भाग अचानक कोसळल्याने त्याखाली दोन मजूर दाबले गेल्याची घटना शुक्रवारी घडली.
दरम्यान दबले गेलेल्या मजुरांना दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर इतर दोघांनी बाहेर उड्या मारल्याने ते बचावले ही घटना जामनेर मध्ये शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. यात सुजित विश्वकर्मा (वय २४ उत्तर प्रदेश), भोजू चरणदास तंवर (वय २३ रा.डोहरी तांडा ता. जामनेर) हे दाबले जाऊन जखमी झाले.
जखमींना पुढील उपचारासाठी जळगावातील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले. जालम सिंग राजपूत यांनी जखमींना तातडीने जामनेर उपजिल्हा रुग्णालय आणले. यावेळी दबले गेलेल्यांना नागरिकांनी बाहेर काढण्यासाठी मदत केली. बचाव कार्य सुरू असताना जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर, जितेंद्र पाटील, चंद्रकांत बाविस्कर, महेंद्र बाविस्कर, डॉ. प्रशांत भोंडे आतिश झाल्टे उपस्थित होते.