अमळनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील मंगरूळ येथे दि. १९ रोजी शिंटू महाजन यांच्या शेतातील गव्हाला आग लागल्याने काही भागातील गव्हाचे पीक जळून खाक झाले. एक एकर शेतातील एक लाख रुपये किमतीचा गहू जळून नुकसान झाले. त्याचप्रमाणे दुपारी दोन वाजेच्या सुमारास धार येथील खळवाळीस आग लागल्याने धोका निर्माण झाला होता.
तर २० रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धुळे रोडवर अमळनेर प्रवेशद्वाराच्या शेजारी रस्त्यालगत कोरड्या गवताला आग लागल्याने त्याठिकाणी नगरपालिकेतर्फे लावलेली झाडे देखील जळाली. आगीचे कारण समजू शकले नाही. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या सूचनेनंतर अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी, फारुख शेख, जफर पठाण , दिनेश बिऱ्हाडे, मच्छीन्द्र चौधरी, लखन कंखरे यांनी तिन्ही ठिकाणी वेळीच जाऊन आगी विझवल्याने मोठे नुकसान होण्यापासून बचावले.