बोदवड, (प्रतिनिधी) : गव्हाने भरलेला तामिळनाडूचा ट्रक मुक्ताईनगर कडून बोदवडकडे येत असताना बंद असलेले रेल्वे गेट तोडून थेट अमरावती एक्सप्रेसला धडकला. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र, ५ तासापासून रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर तीन रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला असून दोन पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत. घटनास्थळी रेल्वे पोलीस व बोदवड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाले होते.
तसेच रेल्वेचे आपत्कालीन विभाग घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. ट्रक क्रमांक (टी एन ५२- एफ -७४७२) दि. १४ रोजी सकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगरकडून बोदवडकडे गहू घेऊन जात होता. ट्रक ओव्हर ब्रिज वरून न जाता बंद असलेल्या रेल्वे गेट तोडून थेट रूळावर आला. त्याचवेळी अमरावतीकडे जाणारी अमरावती एक्सप्रेस वेगात असल्याने ट्रकला धडक देऊन २०० ते ३०० मीटर पर्यंत ट्रकला ओढत नेले. यामुळे रेल्वे इंजिनचे नुकसान तर झालेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी मदत करण्यासाठी पोहचले.
अपघात एवढा भयानक होता की रेल्वे इंजिन खाली अर्धा ट्रक अडकलेला होता. त्यामुळे त्याला काढण्यासाठी क्रेन,जेसीबी घटनास्थळी बोलवण्यात आले होते. या घटनेत कुणालाही दुखापत किंवा मृत्यू झालेला नाही. तर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांचे संपर्क त्यांनी सांगितले की, इंजिनचेही नुकसान झालेले आहे. अपघात झालेले इंजिन दुरुस्तीसाठी पियोजकडे पाठवण्यात येणार आहे तर अमरावती एक्सप्रेसला नवीन इंजिन लावण्यात येऊन गाडी मार्गस्थ करण्यात येईल.