जळगाव, (प्रतिनिधी) : जैन व्हॅली एनर्जी पार्क शिरसोली, जळगाव येथे पी व्ही सोलर केबल चोरीचा प्रकार दि.२७ जानेवारी ला उघड झाला होता. दरम्यान अज्ञात चोरट्याने कंपनीतील २५० मिटर सोलर केबल वायर ही वेळोवेळी चोरी केली होती. त्यानुसार जैन व्हॅली कंपनीचे अविनाश देविदास बढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्या नंतर सोलर केबल ची चोरी ही शिरसोली परीसरातील फैजल रज्जाक पिंजारी (रा. शिरसोली) याने व त्याचे सोबत काही इसमांनी केली असल्या बाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवरा धरण शिरसोली येथे सलग २/३ दिवस थांबुन आरोपी बाबत माहिती काढुन फैजल रज्जाक पिंजारी (वय २५ रा. शिरसोली, ता. जि. जळगाव) यास सापळा रचुन ताब्यात घेतले. त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले.
दरम्यान फैजल याने या चोरीत इतर साथीदार देखील असल्याचे सांगत त्यांची नावे पोलिसांना सांगितली. त्यास पुढील कारवाई कामी एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आले असुन त्याचेकडुन गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलिस स्टेशन चे पोहेकॉ. समाधान टहाकळे हे करीत असुन आरोपीतास न्यायालयाने ३ दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे. स.फौ.अतुल वंजारी, पोहेकॉ. संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, राहुल कोळी यांनी केली असुन त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.








