किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : सोशल मीडियावर राष्ट्रपुरुषांसंदर्भात आक्षेपार्य पोस्ट टाकल्याने एकास कारवाई करत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे जामनेर शहरातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, आरएसएस, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
दरम्यान राष्ट्रपुरुषांबाबत बदनामीकारक मजकूर टाकल्याने संबंधित व्यक्तीवर जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले व संबंधितावर कायद्यानुसार कारवाई करणार असल्याची माहिती दिली.
शिवप्रेमींच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. चौकशीत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची खात्री करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे.
या घटनेमुळे काही ठिकाणी तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने जामनेर पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा, कोणत्याही समाजविघातक पोस्ट टाळाव्यात, तसेच अफवांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.