जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील जळगाव खुर्द गावाजवळ पुलाच्या जवळील बांधकामाच्या ठिकाणी उत्तर प्रदेश येथील तिघं मजुरांचा अज्ञात वाहनाखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. ११ मार्च रोजी पहाटे उघडकीस आली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करीत २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रकाश सुदामाकुमार पटेल (वय २३, रा. उफरवली पोस्ट कोदोरा ता. सियाबल जि. सिंधी, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सदर भीषण घटना घडली होती. या घटनेमध्ये १४ वर्षीय योगेश कुमार राजबहादुर (रा. सीढपुरा ता. कासगंज जि. पटियाली) या बालकासह शैलेंद्रसिंग नथूसिंग राजपूत, भूपेंद्र मीथीलाल राजपूत (दोन्ही रा. दलेलपूर ता.जि. विटा उत्तर प्रदेश) असे मयत झाले होते. यातील एकाच्या डोक्यावरून तर दोघांच्या अंगावरून वाहन गेले होते. जळगाव खुर्द गावाजवळ नाल्याचे स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. हे काम आटपून काही मजूर निघून गेले होते. तर उर्वरित ३ कामगार हे थांबून तिथेच रात्री झोपले होते. तर सकाळी कामाची आवरसावर करून मग उत्तर प्रदेश येथील गावाला तिघही होळी सणानिमित्त जाणार होते.
तपासांती हे वाहन मुरुमाने भरलेले डंपर असल्याचे व त्याचा क्रमांक (एमएच १९ सीवाय ३१९१) असल्याचे निष्पन्न झाले आहे. यासाठी सीसीटीव्ही आणि काही नागरिकांच्या चौकशीमधून माहिती समोर आल्यानंतर संशयित आरोपीचा नशिराबाद पोलीस स्टेशनच्या पथकाला शोध लागला. ओरिएंट सिमेंटच्या एका सीसीटीव्ही कॅमेराची देखील महत्त्वाची मदत यासाठी झाली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.सी. मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, जावेद शहा, राहुल वानखेडे, पोहेका अतुल लक्ष्मण महाजन आदींनी केली आहे.