जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील आकाशवाणी चौकात दिनांक ६ मार्च रोजी ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत ट्रक खाली येऊन जखमी झालेल्या महिलेचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून पुणे येथे उपचार सुरू होते. घटनेप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.
रागिनी चंपालाल पाटील (वय ४५, रा.भुसावळ) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती चंपालाल पाटील, मुलगा देवेंद्र पाटील व मुलगी असा परिवार आहे. दिनांक ६ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता भुसावळ कडून शहरातील खोटे नगर परिसरातील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पतीसोबत जात असताना, त्यांच्या दुचाकीला आकाशवाणी चौकात ट्रकने धडक दिली. त्यात रागिनी पाटील या कोसळून रस्त्यावर पडल्या, त्याचवेळी त्यांच्या हाता पायावरून ट्रक चालून गेल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून, त्यांना पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. मंगळवारी उपचार सुरू असताना त्यांच्या मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला.