जळगाव, (प्रतिनिधी) : खान्देशातील विद्यार्थी, युवक आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी निर्माण करणारा “खान्देश करिअर महोत्सव” दि.२९, ३० व ३१ मार्च रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. सुर्या फाऊंडेशनतर्फे आयोजित महोत्सवाला पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे विशेष सौजन्य लाभणार आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत एम. जे. कॉलेज, जळगाव येथील ए. टी. झांबरे पटांगणावर हा महोत्सव भव्य स्वरूपात पार पडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार, उद्योग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या विविध संधींबद्दल मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अधिकारी आणि उद्योगजगतातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. पद्मालय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.अर्चना सूर्यवंशी, धनराज कासट, प्रशांत सूर्यवंशी, स्वरराजच्या इव्हेंट्सच्या संचालिका मोहिनी चौधरी, मुकूंद गोसावी, पवन जैन, हर्षाली पाटील आदी उपस्थित होते.
महोत्सवाचे उद्घाटन दि.२९ मार्च रोजी सकाळी १० वाजता पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, या कार्यक्रमाला केद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार व प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
अभिनेत्री अलका कुबल यांची विशेष उपस्थिती लाभणार..
दि.२९ मार्च रोजी महिला सशक्तीकरण व करिअरच्या संधींबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांची विशेष उपस्थित राहणार आहेत. यादिवशी सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी खास ‘ब्रायडल शो’ आयोजित करण्यात आला आहे. त्यात ५० पेक्षा जास्त संस्था, ब्युटी पार्लरने सहभाग नोंदवला आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व व्याख्यान..
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दि.३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच, इतर मान्यवर तज्ज्ञ विविध परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण टिप्स व मार्गदर्शन देणार आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण व समारोप..
महोत्सवाचा समारोप दि.३१ रोजी सायंकाळी ७ वाजता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यादिवशी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार असून शालेय संस्थाना पुरस्कार व आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.