जळगाव (प्रतिनिधी) : येथील योगीराज श्री गजानन महाराज बहुउद्देशिय संस्था आणि भक्त परिवार यांच्यावतीने १४७ व्या श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात बुधवार दि. १९ रोजी आयोजित भजन संध्येत भाविकभक्त दंग झाले.
शहरातील इंद्रप्रस्थ नगर येथील केशरबाग परिसरात श्री गजानन महाराज मंदिरात गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त चारदिवसीय उपक्रम घेण्यात येत आहेत. १७ फेब्रुवारीपासून दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत श्री गजानन विजय ग्रंथ सामूहिक पारायण होत आहे. पहिल्या दिवशी १०१ भाविकांनी उपस्थिती देऊन पारायण केले.
विविध भजनांनी आणली रंगत..
या महोत्सवात बुधवारी रात्री ८ वाजता भजन संध्या कार्यक्रमात मुख्य कलाकार संजय क्षीरसागर, संजय पिले, प्रशांत सोनवणे यांनी विविध भजने गाऊन रंगत आणली. प्रारंभी विद्यार्थ्यांनी पुष्पांजली सादर केली. तर देवश्री सोनार हिने ‘किस बात की चिंता’, गायत्री भावसार हिने ‘मनात भरली पंढरी’, माही चौधरीने ‘राम आयेंगे’, खुश बाविस्कर याने ‘राधे चल माझ्या गावाला जाऊ’, मानसी सावळे हिने ‘तुझ्या कृपेची वेठी सदाची’ तर रूपाली बारीने ‘धरीला पंढरीचा चोर’ ही भजने सादर केली. या भजनांना रसिकांनी भरभरून दाद दिली. यासह श्रावणी सागवेकर, श्रीपाद पाठक यांनीही भजन सादर केले. त्यांना वादक कलाकार राजू क्षीरसागर (कीबोर्ड), विजेंद्र शिरसागर (ऑक्टोपॅड), सागर चौधरी (तबला), कृष्णा सोनवणे (ढोलकी) यांनी साथ दिली. सुत्रसंचलन योगेश पवार यांनी केले. तर आभार उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी मानले.
आज पालखी मिरवणूक सोहळा..
तर गुरुवारी प्रकट दिनानिमित्त सकाळी ६ वाजेपासून विविध कार्यक्रम होत आहेत. सकाळी ६ वाजता रुद्राभिषेक, त्यानंतर ७ ते १२ यावेळेत पादुका पूजन, होम हवन, महाप्रसादाचे वाटप होणार आहे. दुपारी ४ वाजता पालखी मिरवणूक सोहळा होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव गणेश शेळके यांनी केले आहे. यशस्वीतेसाठी सोपान पाटील, राजेश पाटील, आरती कपोते, सतीश भोसले, विजय देवरे आदींनी परिश्रम घेतले.