मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : बँकेत रक्कम डिपॉझिट करण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्याकडील सुमारे पावणेदोन लाखांची रोकड भामट्यांनी लांबवली. शहरातील गीतांजली वाईन्सकडील अलीकडील रस्त्यावर ही घटना शनिवार १५ रोजी सकाळी ११ वाजता घडली. अज्ञात चोरट्याविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अफजल अब्दुल फारूक (वय४२, तमिळनाडू, ह.मु.पगारीणबाई निवास, मुक्ताईनगर) यांचा भांडे विक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी सकाळी बँकेत भरणा करण्यासाठी ते दुचाकीवरून आयसीआयसीआय बँकेत आले. मात्र काहीतरी घरी राहिल्याचे आठवल्यानंतर ते पुन्हा दुचाकीने घराकडे निघाले असता घराजवळील मुक्ताईनगर-कोथळी रस्त्यावरील हॉटेल गीताजवळ विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या अज्ञात दोघांनी फारूक यांच्याकडील रोकड असलेली बॅग लांबवली. काही कळण्याच्या आत संशयित पसार झाले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेंद्र सुरवाडे करीत आहेत.