जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात एका भामट्याने सोन्याच्या दुकानात फोन करून डॉक्टर असल्याची बतावणी करत हॉस्पिटलमध्ये सोन्याचा शिक्का मागविला. त्यानंतर शिक्का घेऊन आल्यावर भामट्याने सराफी दुकानातील कर्मचाऱ्याकडून १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा शिक्का घेऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी दुपारच्या सुमारास जळगावातील भंगाळे गोल्ड या सोन्याच्या शोरूममध्ये एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. त्याने आपण आर्किड हॉस्पिटलमधून डॉक्टर जैन बोलत असल्याचे सांगितले. तसेच, तातडीने १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा शिक्का रुग्णालयात पाठवण्याची विनंती केली. शिक्का दिल्यानंतर त्याचे पैसे रुग्णालयात येऊन घेऊन जा, असेही त्याने कर्मचाऱ्याला सांगितले. त्यानुसार, भंगाळे गोल्डमधील कर्मचारी रामगुलाम कौशलप्रसाद त्रिपाठी (वय ६५) हे १० ग्रॅमचा सोन्याचा शिक्का घेऊन आर्किड हॉस्पिटलमध्ये गेले.
तिथे त्यांना एक अज्ञात व्यक्ती भेटली, ज्याने आपण डॉक्टर अग्रवाल असल्याचे सांगितले. त्याने कर्मचाऱ्याकडून ८७ हजार रुपये किमतीचा शिक्का घेतला आणि पैसे न देताच पळ काढला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रामगुलाम त्रिपाठी यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार करत आहेत.