जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णावर व्यवस्थित उपचार होत नसल्याचा आरोप करत एका रुग्णाच्या नातेवाईकाने कर्तव्यावर असलेल्या कनिष्ठ निवासी डॉक्टरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णालयात शनिवारी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सिध्दार्थ भिमराव जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णावर व्यवस्थित उपचार होत नसल्याचा आरोप करत सिद्धार्थ जाधव या रुग्णाच्या नातेवाईकाने कर्तव्यावर असलेल्या कनिष्ठ निवासी डॉ. जैद पठाण यांच्याशी वाद घातला. त्याला डॉ. जैद हे समजावीत असताना त्याने रुग्णसेवेत अडथळा आणून डॉ. जैद पठाण याना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. इमरान नजीम पठाण यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार विक्की केजकर (रा. भुसावळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारती देशमुख करत आहेत.