जळगाव, (प्रतिनिधी) : योगीराज श्री गजानन महाराज बहुउद्देशिय संस्था व भक्त परिवार यांच्या तर्फे आयोजित १४७ व्या प्रगट दिन महोत्सवाची सोमवारी दि. १७ रोजी सुरवात झाली. पहिल्या दिवशी १०१ भाविकांनी उपस्थिती देऊन पारायण केले.
शहरातील इंद्रप्रस्थ नगर येथील केशरबाग परिसरात श्री गजानन महाराज मंदिरात गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त चारदिवसीय उपक्रम घेण्यात येत आहेत. सोमवारी दि. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनदिवसीय श्री गजानन विजय ग्रंथ सामूहिक पारायण करण्यास सुरुवात करण्यात आली. पारायण वाचक दिपाली प्रशांत कुळकर्णी यांनी महिला भाविकांना मार्गदर्शन करून माहिती दिली. यावेळी ‘गण गण गणात बोते’ चा गजर करीत भाविकांकडून श्री गजानन महाराजांचा जयघोष करण्यात आला.
सामूहिक पारायण बुधवारी दि. १९ फेब्रुवारीपर्यंत सुरु आहे. बुधवारी रात्री ८ वाजता भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. तर गुरुवारी प्रकट दिनानिमित्त सकाळी ६ वाजेपासून विविध कार्यक्रम होणार आहेत. दुपारी ४ वाजता पालखी मिरवणूक सोहळा आयोजित आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव गणेश शेळके यांनी केले आहे.