जळगाव, (प्रतिनिधी) : हिंदू संघटना, हिंदुत्वनिष्ठ नेते तसेच हिंदु जनजागृती समिती यांच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल करून पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करणार्या तिस्ता सेटलवाड आणि त्यांच्या ‘सिटिझन्स फॉर जस्टीस अँड पीस’ (सी.जे.पी.) या संस्थेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना तक्रारीचे निवेदन सादर करण्यात आले.
तक्रारीच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर, महाराष्ट्र – गोवा बार कौन्सिलचे माजी चेअरमन ज्येष्ठ विधीज्ञ भरत देशमुख, अधिवक्ता पंकज पाटील तसेच योग वेदांत सेवा समितीचे अनिल चौधरी हे उपस्थित होते.
हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदू नेत्यांविरुद्ध खोट्या तक्रारींची मालिका उभी करून सामाजिक तेढ निर्माण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच यामागे ‘डिप स्टेट’ आणि ‘शहरी नक्षलवाद’ यांचे काही देश व हिंदु विरोधी कटकारस्थान आहे का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी समितीने केली आहे.