जळगाव, (प्रतिनिधी) : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी तैनात एलसीबीच्या पथकाने आकाशवाणी चौकात एक डंपर जप्त करून २ संशयित व्यक्तींना अटक केली आहे. सावखेडा शिवारातील गिरणा नदीपात्रातून वाळू चोरी करून जात असताना त्यांचेवर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोहेकों विजय दामोदर पाटील यांनी फिर्याद दिली आहे. दि. ८ फेब्रुवारी रोजी पोउनि दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, सफौ रवि नरवाडे, सफौ राजेश मेढे, पोहेकों हरिलाल पाटील, पोहेकॉ अकरम शेख, विजय पाटील यांची रात्रगस्त ड्युटी होती. त्यानुसार रविवारी दि. ९ रोजी रात्री १ वाजता जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात नॅशनल हायवे क्र. ४६ वर पाळधीकडुन जळगांवकडे १ पिवळ्या रंगाचे डंपर येतांना दिसले. त्याला थांबविले असता डंपरचा (क्र.एमएच -१९-झेड-७७७४) यामध्ये वाळु भरलेली दिसून आली. चालक रविंद्र राजु सोनवणे व योगेश किरण रंधे (रा. सावखेडा ता.जि. जळगांव) यांना ताब्यात घेतले.
त्यांना सदर वाळु वाहतुकीचा परवाना आहे अगर कसे बाबत विचारणा केली असता, त्याने वाळु वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगीतले. अधिक चौकशी केली असता, सदरची वाळु ही सावखेडा शिवारातील गिरणा नदी पात्रातुन चोरुन आणल्याचे दोघांनी सांगितले. सदर डंपर हे रमेश यशवंत पानपाटील (रा. सावखेडा ता.जि. जळगांव) यांचे मालकीचे आहे. या डंपरमध्ये १२ हजार रुपयांची ४ ब्रास वाळू, ४ लाख रुपयांचे डंपर जप्त करण्यात आले आहे. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.