जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील भोकर मार्गे चोपडा बंद केलेली बस सेवा त्वरित सुरू करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
जळगाव तालुक्यातील भोकर हे लोक वस्तीच्या मानाने मोठे गाव असल्यामुळे या ठिकाणी दळणवळणाची साधने कमी आहेत त्यामुळे नेहमी येजा करणाऱ्यांना सोयीचं व्हावं म्हणून जळगावहून सुटणारी भोकर मार्गे चोपडा बस सेवा ही आधीप्रमाणेच सुरू करण्यात यावी अन्यथा महामंडळाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, प्रमोद घुगे, प्रशांत सुरळकर, किरण भावसार, उमेश चौधरी, गायत्री सोनवणे, मनीषा पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
या बस सेवेमुळे चोपडा आणि जळगाव येथे ये जा करणारे प्रवासी यांना सोयीची वाहतूक होणार असून भोकर मार्गे बस सुरू केल्यामुळे किमान १५ ते २० किलोमीटरचे अंतर हे या निमित्ताने वाचणार आहे असल्याचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी सांगितले.