भुसावळ, (प्रतिनिधी) : मालेगावात कर्तव्यावर असताना बांगलादेशी नागरिकांना जन्मदाखला दिल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर मालेगावचे तत्कालीन व बोदवडचे विद्यमान तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना शासनाने सेवेतून निलंबित केले आहे. याबाबतचे निलंबन आदेश महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख यांनी गुरुवारी दिनांक २३ जानेवारी काढले आहेत.
बांगलादेशी नागरिकांना मालेगावात जन्मदाखले देण्यात आल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली होती. माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावात बांगलादेशींना वारेमाप जन्मदाखले वाटप झाल्याची तक्रार शासनाकडे केली होती व बांगलादेशींचे बेकायदा असलेल्या वास्तव्याबाबतही तक्रार केली होती.
किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर व आरोपानंतर शासनाकडून दखल घेण्यात आली. गुरुवारी २३ जानेवारी रोजी बोदवडचे विद्यमान व मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्यासह नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना शासनाने निलंबित केले आहे. धारणकर यांची विभागीय चौकशी होणार आहे. देवरे यांच्या निलंबन काळात जळगाव हे मुख्यालय असेल. शिवाय, त्यांना या काळात कोणताही व्यवसाय करता येणार नाही, तसेच धारणकर यांचे मुख्यालय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय असेल.
तक्रारीच्या चौकशीसाठी एसआयटी जन्म व मृत्यू नोंदणीसंदर्भातील तथा अधिकार जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. गृह विभागाकडे आलेल्या तक्रारींच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून, पुढील आदेश येईपर्यंत जन्म व मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही करू नये, असे उपसचिव महेश वरूडकर यांनी आदेशात नमूद केले आहे.