जळगाव, (प्रतिनिधी) : येथील जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे जुने जळगाव येथील बदाम गल्लीत दि.१५ पासून सुरु असलेल्या संगीतमय श्रीमद् भागवत कथेची बुधवार दि. २२ रोजी दुपारी भव्य शोभायात्रा काढून सांगता झाली. यावेळी अडीच हजाराहून अधिक भाविक पारंपरिक वेशभूषा साकारत सहभागी झाले होते. शोभायात्रेत भाविकांनी प्रभू श्रीरामांच्या जयघोषात उत्साह दाखविला. शोभायात्रेआधी सकाळी हभप योगी दत्तानाथ महाराज, शिंदखेडा यांचे गोपाळ काल्याचे किर्तन झाले. किर्तनात उपस्थित सर्व भाविक दंग झाले होते.
गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या संगीतमय श्रीमद् भागवत कथेत बीड येथील भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामीजी यांनी भाविकांना उपदेश दिला. दररोज रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील विविध कीर्तनकारांचे त्यांच्या सुश्राव्यवाणीतून कीर्तन झाले. संध्याकाळी हरिपाठ घेण्यात आला. तर दररोज पहाटे साडेपाच वाजता काकड आरती करण्यात येत होती. जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे २२ रोजी दुपारी बदाम गल्लीपासून वाजत – गाजत भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. भाविक महिला – पुरुष पारंपरिक वेषभूशेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रेत महिला भाविकांनी डोक्यावर कळस, तुळशी घेऊन सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी पावली खेळून सप्ताहात उत्साह आणला. जिवंतपणी सुखाचा आनंद घ्यायचं असेल तर महाकुंभात जा किंवा पंढरपूच्या वारीला जा, असेही त्यांनी सांगितले. यशस्वीतेसाठी जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.
१५ हजाराहून अधिक भाविकांनी महाप्रसाद घेतला लाभ..
सायंकाळी ५ वाजता भरीत पुरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी १५ हजाराहून अधिक भाविकांनी भरीत पुरीचा महाप्रसाद घेतला. त्यासाठी तब्बल ५० क्विंटल भारीताचे वांगे, १५ क्विंटल गहूपासून पुऱ्या तयार करण्यात आल्या होत्या. तर वांगे भुजण्यासाठी सुमारे २०० फूट लांब अशी चूल तयार बनविली होती. आचारी दिगंबर कोल्हे यांच्यासह १५० कार्यकर्त्यांनी हा महाप्रसाद तयार केला. हभप योगी दत्तानाथ महाराज यांनी सुरुवातीला, देशभरातील साधू संतांचा जयघोष केला. विविध अभागांचे चिंतन करत ते म्हणाले, १४४ वर्षानंतर होणारा महाकुंभ सध्या सुरु झाले आहे. तसेच सुमारे ५०० वर्षांपासून प्रतीक्षा गेल्या वर्षी संपून राम मंदिर बनले. त्यामुळे सनातन धर्मासाठी हा सुवर्णकाळ आहे.