जळगाव, (प्रतिनिधी) : भगवान श्रीकृष्णाने चार रूपे बनविले. भगवतमध्ये पाहिले, दुसरे वैकुंठ गमन, तिसरे पंढरपूरला पांडुरंग म्हणून विटेवर उभे राहिले. तर चौथे रूप तुळशीमध्ये ठेवले. त्यामुळे भगवत कथा श्रवण करणे म्हणजे एकप्रकारे श्री कृष्णाची सेवा, भक्ती करणे आहे, असा संदेश बीड येथील भागवताचार्य हरिहरानंद भारती स्वामी यांनी दिला.
येथील जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे दि. १५ ते २२ जानेवारीपर्यंत जुने जळगाव येथील बदाम गल्लीत संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दररोज रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील विविध कीर्तनकार त्यांच्या सुश्राव्यवाणीतून कीर्तन करीत आहेत. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती करण्यात आली. कथेत सातव्या दिवशी स्वामींनी मुलगी आणि बापाचे नात्याविषयी सांगतांना आई-वडिलांचे कशीही सेवा करा, त्यांना म्हातारपणी सांभाळा, त्यांची काजळी घ्या. गुण जुळण्यापेक्षा मन जुळणे महत्वाचे आहे, असेही भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामीजी यांनी सांगितले. यावेळी रुख्मिणीचा विवाहानंतर वडिलांपासून विरहाचा प्रसंग सांगताना भाविक महिला भावनिक झाल्या होत्या.
यावेळी श्री कृष्ण आणि सुदामाच्या भेटीचा प्रसंगाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. तसेच कथेची सांगता होत असताना फुलांची होळी खेळण्यात आली. त्यात सर्व भाविक न्हाऊन गेले होते. कथेनंतर उमेश कोल्हे, मोहन कोल्हे, अरुण पाटील, घनशाम खडके, गिरीष कोल्हे, हरीश कोल्हे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. संध्याकाळी हरिपाठ घेण्यात आला. रात्री हभप गजानन महाराज, वरसाडेकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी पावली खेळून सप्ताहात उत्साह आणला.
आज भव्य शोभायात्रा
जय हनुमान सांस्कृतिक मंडळातर्फे बुधवार, २२ रोजी सकाळी हभप योगी दत्तानाथ महाराज, शिंदखेडा यांचे गोपाळ काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. भाविकांनी शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे करण्यात आले आहे.