जळगाव, (प्रतिनिधी) : प्रभू श्रीराम आपले भूषण आहे. प्रत्येकाने त्यांचा आदर्श घेऊन संसार करावा. प्रभू श्रीरामांनी संकटातून मात करत आयुष्यामध्ये आदर्श निर्माण केले आहेत आदर्श निर्माण केले आहेत, असा संदेश बीड येथील भागवताचार्य हरिहरानंद भारती स्वामी यांनी दिला.
येथील जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे दि. १५ ते २२ जानेवारीपर्यंत जुने जळगाव येथील बदाम गल्लीत संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दररोज रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील विविध कीर्तनकार त्यांच्या सुश्राव्यवाणीतून कीर्तन करीत आहेत. सोमवारी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती करण्यात आली.
कथेत सहाव्या दिवशी स्वामींनी भगवान श्रीकृष्णांच्या नटखट लीलांचे वर्णन केले. तसेच शिव शंकराच्या महिमांचे कथन केले. आईचे प्रेम जगावेगळे असते. जीवन सुधारण्यासाठी, आपला धर्म समजण्यासाठी मुलाना कथा, कीर्तनाला आणले पाहिजे. ज्याच्या डोक्यावर भगवंताचा हात असतो त्याला ‘माया’ काहीही करू शकत नाही. शेवटी भगवंताकडे जायचे आहे. हे कायम लक्षात ठेवून जीवन जगावे. रंगपंचमीचा रंग मिटून जाईल. परंतु ईश्वराचा रंग कधीही मिटणार नाही. त्यामुळे भगवंताच्या भक्तीचा रंग आपल्याला लागला पाहिजे, असेही भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामीजी यांनी सांगितले.
यावेळी गोवर्धन पर्वताचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. तसेच गोपाळ कृष्णासाठी ५६ भोगचे नैवेदय अर्पण करण्यात आले होते. विविध भजनांवर कान्हासह संवगडी, राधा, रुख्मिणी, भाविकभक्त ठेका धरला. ‘कन्हाया लाल की जय… जय हनुमान… सियावर राम की जय….’ नामाने सभा मंडप दणाणून निघाला होता. मंडपात श्रीकृष्णाचा विवाह सोहळा साजरा करण्यात आला. माजी आमदार मनीष जैन, माजी नगरसेवक मनोज चौधरी यांनी अंतरपाट धरले होते.
यावेळी डीवायएसपी अशोक नखाते यांचा जय हनुमान मित्र मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. कथेनंतर माजी आमदार मनीष जैन, मनोज चौधरी, बजरंग दलाचे ललित चौधरी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. संध्याकाळी हरिपाठ घेण्यात आला. रात्री हभप राधेश्याम महाराज गाढे, येवला यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.