जळगाव, (प्रतिनिधी) : खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटाच्या महिलांना व लघु उद्योजकांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सवाच्या दहाच्या वर्षांचे आयोजन दि.२३ ते २७ जानेवारी २०२५ रोजी जळगावातील सागर पार्कवर आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खान्देशातील महिला बचत गट व लघु उद्योजकांनी निर्माण केलेल्या वस्तुंना हक्काची बाजार पेठ निर्माण व्हावी, त्यांनी निर्माण केलेल्या वस्तुंना योग्यतो भाव मिळावा व त्यातुन त्यांची आर्थिक उन्नती व विकास व्हावा. हा मुळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
बहिणाबाई महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे बहिणाबाई खाद्य महोत्सव बचत गटाने तयार केलेल्या विविध खाद्य पदार्थाना जळगावकर नागरीकांची विशेष मागणी असते भरीत भाकरी, शेवभाजी, खापरावरची पुरणपोळी सह खान्देशातील विविध खाद्य पदार्थांचा या महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर नागरीक आस्वाद घेता येणार आहे.
यावर्षीच्या बहिणाबाई महोत्सवात विशेष आकर्षण म्हणजे सिने अभिनेत्री श्रेया बुगडे व सिने अभिनेता कुशल बद्रिके यांचा ‘चला हवा करूया” हा कार्यक्रम होणार आहे. तसेच ‘ही लावणी महाराष्ट्राची” सुप्रसिद्ध लावणीकलावंत शाहीर मीरा दळवी पुणे सादर करणार आहे. शाहीर सुमित धुमाळ आणि सहकारी छत्रपती संभाजी नगर यांचा ‘शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण” शाहिरी पोवाडा व पारंपारिक गोंधळचा कार्यक्रम तर अकोला येथील प्रसिद्ध भारुडकर विद्या भगत यांचा ‘भारुड प्रबोधनाचे” हा कार्यक्रम या महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी साज मेकअप स्टुडिओ यांच्या वतीने “मराठी संस्कृतीचा फॅशन शो” चे आयोजन या महोत्सवात करण्यात आलेले आहे. खान्देशातील विविध लोककला शाहीरी, भारूड, लोकगीते, लोकनृत्य, वहीगायन, आदी लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन युवा कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी बहिणाबाई महोत्सवाचा सांस्कृतिक मंच खुला ठेवण्यात आला आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग व महिला विकासाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. खान्देशासह राज्यभरात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी बहिणाबाई महोत्सवात जळगाव शहराला उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व सांस्कृतिक क्षेत्रात विकसित शहर करणाऱ्या व्यक्तींचा ‘रायझिंग जळगाव” या सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे.
गत नऊ वर्षात जळगांव शहरातील नागरीकांसह जिल्हाभरातुन मोठ्या संख्येने नागरीकांनी हजेरी लावली आहे. यावर्षी देखील अंदाजे १ लाख नागरीक या महोत्सवाला भेट देतील असा अंदाज असुन त्यानुसार संपुर्ण महोत्सवाचे आयोजन नियोजन करण्यात आले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
बहिणाबाई महोत्सवाच्या दहाव्या वर्षाचे आयोजन विविध कार्यक्रमासह खाद्य संस्कृती व लोककलेच्या जागराने रंगणार असून जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात हजेरी लावून जळगावच्या लोक उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.