जळगाव, ( जिमाका ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १०० दिवसांचा कृति आराखडा घोषीत केल्याच्या अनुषंगाने अन्नसुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी दुरदृश्र्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत अन्न व्यसायिकांचे परवाना/नोंदणी, धडक मोहिम, दुध व दुग्धजन्य पदार्थांचे नमुने, Fostac Training , Hygiene Rating, Eat Right Campus यांचे कामकाज प्रभावीपणे करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
तसेच, भेसळ रोखण्याकरिता व राज्यातील जनतेस उपलब्ध होणा-या दूध व दुग्धजन्य अन्न पदार्थांची गुणवत्ता तपासण्याच्या अनुषंगे संपूर्ण राज्यात दुध व दुग्धजन्य अन्न पदार्थांची सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येत आहे. १०० दिवसांचा कृति आराखडा अंतर्गत प्रशासनाने अन्न आस्थापनांच्या तपासण्या व नमुने विश्लेषणासाठी घेण्याची विशेष मोहिम हाती घेतलेली आहे.
त्याअनुषंगाने जळगाव जिल्हयात आज दिनांक १५ जानेवारी रोजी विशेष मोहिम राबवली. यात विविध आस्थापनांची तपासणी करुन दुध या अन्न पदार्थांच्या विविध ब्रॅण्डचे एकूण १५ नमुने विश्लेषणास्तव घेण्यात आले. त्यासमवेत मे. रविराज एजन्सी, विसनजी नगर, जळगाव यांच्याकडे दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा सुमारे रु.४०९५/- रुपयांचा साठा हा मुदतबाह्य असल्याचे आढळून आल्यामुळे जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीकोनातून पुर्नवापर होवून नये म्हणून विक्रेता यांच्या समोरच हा साठा तात्काळ नष्ट करण्यात आला. तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमावली अंतर्गत पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त राजेशजी नार्वेकर, सह आयुक्त (नाशिक विभाग ) म.ना.चौधरी, जळगाव जिल्हयाचे सहायक आयुक्त (अन्न) सं.कृ.कांबळे व अन्न सुरक्षा अधिकारी कि.आ.साळुंके व श.म.पवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली. अशी माहिती जळगाव जिल्हयाचे सहायक आयुक्त (अन्न) सं.कृ.कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.