जळगाव, (प्रतिनिधी) : येथील गणेश वाडी परिसरात संगीतमय श्रीमद भागवत कथेच्या शेवटच्या दिवशी सकाळी गोपाळ काल्याचे किर्तन झाले. कीर्तनामध्ये हभप देवदत्त मोरे महाराज यांनी मधुर वाणीतून श्रीकृष्णाच्या लीलांचे वर्णन केले.
अयोध्या मध्ये प्रभू श्रीरामचंद्र मंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्ती निमित्त गणेशवाडीत संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन केले होते. या कथेच्या आठव्या दिवशी गोपाळ काल्याचे कीर्तन झाल्यानंतर उपस्थित भाविकांना काल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
काल्याचे कीर्तन म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वश्रेष्ठ कीर्तन आहे. देवालाही दुर्लभ असलेला काला हा संतांच्या संगतीमुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो, असे हे दुर्लभ असे भाग्य मानवाला मिळाले म्हणून ‘तुका म्हणे काला दुर्लभ कोणाला’ असा उच्चार करतात. देवांनाही दुर्लभ हा काला सर्वसामान्यांना केवळ संतांच्या संगतीमुळे लाभतो म्हणून तुझे संगती झाली माझी शुद्धी तृप्ती, असे गोपाळ काल्याचे वर्णन हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी याप्रसंगी केले.