जळगाव, (प्रतिनिधी) : सुरतहून महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या रेल्वेवर जळगावमध्ये रविवारी दगडफेक करण्यात आली. सुरतहून प्रयागराजकडे जाणाऱ्या ताप्तीगंगा एक्सप्रेस गाडीवर दगड फेकुन काच फोडण्यात आली. सुरतहून निघालेली ट्रेन जळगावला येत असताना ही घटना घडली. त्यामुळे डब्याच्या बाजूच्या काचाही फुटल्याने डब्यातील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले.
महाकुंभ प्रयागराज ट्रेन, ताप्ती गंगा ट्रेन सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवरून निघाली होती. महाकुंभमेळ्यापूर्वी या ट्रेनमधून मोठ्या संख्येने भाविक शाही स्नानासाठी सुरतहून निघाले. बी ६ कोचमधून सुरतचे भाविक प्रवास करत होते. ट्रेनमधील ४५% लोक कुंभासाठी प्रयागराजला जात आहेत. ताप्ती गंगा ट्रेन उधना येथून निघून महाराष्ट्रात जळगावमधून जात होती.
यादरम्यान रेल्वेवर अज्ञाताने दगड फेकला. त्यामुळे बी ६ कोचमधील खिडकीच्या काचा फुटल्या. डब्यातील लहान मुले व महिलांसह भाविकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या प्रकरणी रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.