जळगाव, दि. 29 – आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे येत्या 31 ऑक्टोबर, रविवार रोजी ‘खान्देश गौरव’ पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ‘आयुष’ ही संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असून आयुर्वेदिक, अँक्यूपंक्चर, युनानी, योगा आणि नॅचरोपॅथी, सिद्ध, होमिओपॅथी या सात पॅथी एकाच छताखाली संघटनेने यशस्वीरीत्या एकत्र आणल्या आहेत. ही संघटना केंद्र सरकार सोबतही कार्य करीत आहे. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन आणि जळगावातील सुवर्ण पुनर्वसू आयुर्वेदतर्फे या विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे..
कोरोनाचे नियमांचे पालन करत धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यातील काही डॉक्टरांचे कौतुक करण्यासाठी खान्देश गौरव पुरस्कार सोहळ्याचे जळगावात आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सतीश कराळे (नागपूर), उपाध्यक्ष डॉ.नितीन पाटील (बुलडाणा), महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ.सतीश कुळकर्णी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
दरम्यान कार्यक्रमात डॉक्टरांचा विशेष सन्मान केला जाणार असून तसेच वैद्यकीय क्षेत्राबद्दल काही स्लाईड शो, व्याख्यान आणि मार्गदर्शनही केले जाणार आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असून सन्मानार्थी डॉक्टर्स आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयुर्वेद विभागाचे उपाध्यक्ष डॉ.राकेश झोपे ,आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते तुषार वाघुळदे यांनी केले आहे.
समारंभाला मास्क घालणे अनिवार्य आहे. सदर कार्यक्रम हा फक्त निमंत्रितांसाठीच असणार आहे असेही आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.