जळगाव, (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यातील वावडे येथे सोलर केबल चोरी प्रकरणातील पाच संशयित आरोपींना धुळे जिल्ह्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अंमळनेर तालुक्यातील वावडे गावातील एमईसीबीच्या सोलर प्लान्ट येथे सोलर केबल चोरी झाल्याबाबत मारवाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर केबल चोरीचा गुन्हा उघड करुन आरोपी अटक करणे बाबत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना आदेश दिले होते.
त्यावरुन पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोह संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, गोरख बागुल, भगवान पाटील, राहुल कोळी, राहुल बैसाणे, दिपक चौधरी, महेश सोमवंशी आदींचे पथक तयार करण्यात आले होते.
सीसीटिव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणावरुन वावडे गावातील चोरी करणाऱ्या संशयित गोकुळ हिरामण कोरडकर (वय २५ वर्षे), भावडू जानकु थोरात (वय २४), जिभाऊ वामन थोरात (वय २८ वर्षे, रा. सर्व रायपुर ता. साक्री जि. धुळे, गोकुळ राजेंद्र भामरे (वय २४), राकेश धनराज पाटील (वय २४ वर्षे, रा. दोन्ही कापडणे ता.जि. धुळे) यांना ताब्यात घेतले.
त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी एमईसीबीच्या सोलर प्लान्टमधील सोलर केबल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांचे सोबत असलेले इतर ०५ आरोपी फरार असुन पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहेत. तरी नमुद ०५ संशयित आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ०३ दिवस पोलीस कोठडी मंजुर केली असुन पुढील तपास मारवाड पो. स्टे. करीत आहे.