जळगाव, (प्रतिनिधी) : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महिलांसाठी जिल्हा स्तरावर विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. दरम्यान जळगावात मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे यांच्या गणपती नगरातील कार्यालयात मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. महिलांच्या विविध तक्रारी व समस्यांसाठी हा कक्ष कार्यरत असेल. प्रशासनिक स्तरावर या तक्रारींचे निराकरण करून महिलांना न्याय देण्याचा मनसेचा प्रयत्न असेल.
महिलांच्या समस्या ऐकण्यासाठी दर शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत कक्ष खुले राहील. या कालावधीत येणाऱ्या सर्व तक्रारींवर योग्य तो पाठपुरावा करून त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. यात कौटुंबिक हिंसाचार, छळवणूक, सामाजिक अन्याय, कायदेशीर मार्गदर्शन, इतर प्रशासकीय समस्या संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपापल्या कार्यक्षेत्रात महिला मदत कक्ष सुरू करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने महिला मदत कक्ष सुरू करण्यात येत आहे. महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी केला आहे.