जळगाव, (प्रतिनिधी) : परिवर्तनचे सांस्कृतिक कार्य उत्तम असून ते अधोरेखित झालेले आहे, असे मत रंगकर्मी व जेष्ठ विधीज्ञ सुशील अत्रे यांनी परिवर्तन मैत्र महोत्सवाच्या आठव्या दिवशी कार्यक्रमात व्यक्त केले. याप्रसंगी केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमलकर यांनी परिवर्तन ही गेल्या अनेक वर्षापासून सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था जळगावची सांस्कृतिक ओळख आहे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी मंचावर डॉ राधेश्याम चौधरी, रोहित निकम, डॉ. सुलोचना साळुंखे, माजी जि.प.सदस्य विश्वनाथ पाटील या प्रमुख अतिथीसोबत महोत्सव प्रमुख नंदुभाई अडवाणी, स्वरुप लुंकड, मानसी गगडाणी, विनोद पाटील हे उपस्थित होते.
भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित महोत्सवात आठव्या दिवशी पु. ल. देशपांडे लिखित ‘मॅड सखाराम’ हे नाटक सादर झाले. दिग्दर्शन मंगेश सातपुते यांचे होते. मॅड सखाराम हे नाटक सुप्रसिद्ध अशा सखाराम बाईंडर या नाटकावर विनोदी अंगाने पू. ल. देशपांडे यांनी लिहिले असून ५० वर्षानंतर प्रथमच मंगेश सातपुते यांनी हे ‘मॅड सखाराम’ नाटक रंगमंचावर आणले.