एरंडोल, (प्रतिनिधी) : घराच्या तिसऱ्या मजल्यावरील छताच्या कडीला दोराने गळफास घेऊन मायलेकींनी आत्महत्या केल्याची घटना महादेव मंदिर परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सपना प्रकाश माळी (वय ३३) व केतकी सपना माळी (वय ९) असे मयत मायलेकीचे नाव आहे. घटनास्थळी गादीवर वही मिळून आली. त्यात सपना माळी हिच्या हस्ताक्षरात लिहिलेले असून तिने आपल्या नातेवाईकांचे नावाने लिखाण केलेले आहे. त्यामध्ये आपल्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केलेला आहे. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. एरंडोल येथे जहांगीरपुरा भागातील महादेव मंदिर परिसरात सपना माळी ही माहेरी राहत होती. तिचा घटस्फोट जवळपास आठ वर्षांपूर्वी झालेला होता. गुरुवारी दुपारी तिसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता. मृत महिलेचा भाऊ राहुल माळी याने एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिली.
राहुल हा घरी गेला असता त्याला त्याची बहीण सपना व भाची केतकी हे घरी दिसले नाहीत म्हणून त्याने तिसऱ्या मजल्यावर जाऊन बघितले असता खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता त्याने बहिणीला आवाज दिला असता काही एक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्याचा चुलत भाऊ मोहन महाजन यास फोनद्वारे सदर घटना सांगितली. सुताराला बोलवुन दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा तोडला असता सपना व केतकी या दोघी छताच्या वेगवेगळ्या कडीला दोराने गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आल्या. त्यावेळी राहुलने एकच हंबरडा फोडला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले, हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.